मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी
अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. मुंबई, ठाणे, नागपूर ही शहरे वगळता इतर महाराष्ट्रात देखील अंमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार रोखायचे असतील तर तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा अशी आक्रमक मागणी अजित पवार यांनी केली आहे. अंमली पदार्थांमुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. कॉलेजच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तरुण पिढी बिघडत चालली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले. अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबईत पाच स्वतंत्र कक्ष कार्यरत असल्याचेही रणजित पाटील यांनी सांगितले. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही रणजित पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS