…असं होणार आघाडीचे जागावाटप, युतीतील अनेक नेते आमच्या संपर्कात – अजित पवार

…असं होणार आघाडीचे जागावाटप, युतीतील अनेक नेते आमच्या संपर्कात – अजित पवार

यवतमाळ – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत आज अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी -काँग्रेस व मित्रपक्ष एकत्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू असून कोणत्या मतदारसंघात कुणाचा उमेदवार निवडून येणार, हे समोर ठेवूनच जागावाटप केलं जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच युतीमधील अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटविल्याचे स्वागत, भारताने आता पाकव्याप्त काश्मीर आणि चीन ने गिळलेला भूभाग परत मिळवावा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पक्षांतर करून गेलेल्यांच्या पदरी निराशा येणार, भाजप सेना युती होणार नाही व उमेदवारी दाखल होईपर्यंत मोठी राजकीय घडामोडी होणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. पक्षात घेतलेल्याना भाजप उमेदवारी देऊच शकणार नाही, युती झाली तर पोळा फुटणार असून आघाडी देखील ज्या जागा पक्क्या तेवढ्याच उमेदवारी जाहीर करणार, आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर कोण कोणत्या पक्षात ते कळेल असही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यवतमाळमध्ये पोहचली आहे. यादरम्यान अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन व कापूस ही दोन महत्त्वाची पिके घेतली जातात. या पिकांचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. याउलट विमा कंपन्या हजारो कोटी रुपये गिळून बसल्या आहेत. या कंपन्यांच्या गैरव्यवहारामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू राहिलेलं नाही. पाच वर्षांत शेतकरी, महिला, युवक व तरुणांचे प्रश्‍न सोडविले गेले नाहीत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करोडो रुपयांची आश्वासने देण्याचं काम कॅबिनेट बैठकींमार्फत या फसव्या सरकारनं सुरू केले असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी आमदार संदीप बाजोरीया, प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ गाडबैले उपस्थित होते.

COMMENTS