बारामती – भाजपच्या खासदार पुनम महाजन यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपलं वय काय?आपली राजकीय कारकीर्द काय? स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते? आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना ‘शकूनी मामा’ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? अशा शब्दांत अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
दरम्यान पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना ‘शकूनी मामा’ची उपमा दिली होती. अजित पवार यांनी आज आपल्या भाषणात पूनम महाजन यांचा आपल्या शैलीत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ”आपण काय बोलतोय, कोणाबद्दल बोलतोय याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं. तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं असं जर आम्ही तुला विचारलं तर तुझ्याकडे काय उत्तर आहे…सख्या भावाने सख्ख्या भावाला मारलं, मग हे महाभारत कशामुळे घडलं, असा प्रश्न आम्ही विचारायचा का तुम्हाला? जसं तुम्हाला बोलता येतं तसा आम्हाला बोलता येतं. पण पातळी सोडायला नको हा विचार करून आम्ही काही बोलत नाही. पण आम्ही शांत बसतो याचा अर्थ तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही ते सहन करू असा होत नसल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS