मुंबई – राज्यातील प्रत्येक नेत्यांची बोलण्याची शैली वेगवेगळी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही बोलण्याची शैली वेगळी आहे. ती राज्याला चांगलीच परिचीत आहे. आपल्या मिश्किल स्वभावासाठी आणि बोलण्यासाठी अजित पवार ओळखले जातात. याचा प्रत्यय आज अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सभागृहात आला.
झालं असं की काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता घोषित करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. यावेळी अजित पवार यांनी आता आमचा तिसरा पक्षनेता तरी पळवू नका, असं आपल्या मिश्किल अंदाजात मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. याअगोदर 2014 साली विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचं नाव होतं. मात्र ते ही नंतर सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आता आता आमचा तिसरा पक्षनेता तरी पळवू नका, असं अजित पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
दरम्यान आजचा अधिवेशनाचा पहिल्याच दिवस चांगलाच गाजला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून घोषणा देऊन विधिमंडळाचा परिसर चांगलाच दणाणून सोडला होता.आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या दिशेने येताच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधी पक्षांनी ‘आले रे आले चोरटे आले…’ अशा घोषणा दिल्या. तसेच राधाकृष्ण विखेंना उद्देशून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी ‘आयाराम गयाराम जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
COMMENTS