मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन आज मोठ्या थाटात पार पडला. या कर्यक्रमात बोलत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीत ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा संशय व्यक्त केला.यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी ईव्हीएम संदर्भात मी तज्ञांकडून जाणून घेतलं. एव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यात काही गडबड नाही, तर बाजूला बसलेल्या अधिकाऱ्याच्या मशीनमध्ये गडबड आहे. तुम्हाला व्हीव्हीपॅटमध्ये दिलेलं मत दिसतं, पण त्या अधिकाऱ्याकडे काय गेलं हे तुम्हाला काय माहित? आणि मत मोजणीला पुन्हा तेच घेतलं जातं. आम्ही दिल्लीला जाऊन यावर बैठक घेणार असल्याचं म्हटलं आहे.
तर धनंजय मुंडे यांनी अनेक ठिकाणचे निकाल कसे लागले कळत नाहीत. अनेक गावात जिथे भाजपला कधीही मतदान मिळत नाही तिथं भाजपला मतदान कसं मिळतं हा प्रश्न आहे. हा विजय भाजपचा नाही, ईव्हीएम छेडछाडीचा विजय आहे असं महटलं आहे.
परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या नेत्यांसमोरच ईव्हीएमवरील आरोप खोडून काढले. जिंकल्यावर ईव्हीएमवर संशय नसतो, पण पराभवानंतरच का? असा सवाल करत कामाला लागण्याच्या सूचना अजित दादांनी केल्या आहेत. तसेच लोकसभा निकाल कसा लागला त्याची जास्त चर्चा करत बसू नका. आता विधानसभेला चांगल्या पद्धतीने सामोरं जा. जीवाचं रान करुन पक्षासाठी काम करा. निवडून आले तेव्हा ईव्हीएमला दोष द्यायचा नाही आणि पडल्यावर कसा दोष द्यायचा? पण तोच विषय घेऊन कामात कमी पडू नका, असं अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
COMMENTS