मुंबई – जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी थांबलेली नाही. शेतकरी बायमेट्रीकसाठी तयार नाहीत आणि शासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी व्यस्त असल्याने यात काहीसा संथपणा आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरते मर्यादित असल्याचा खुलासाही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे.
COMMENTS