भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या आमदाराला अजितदादांनी मारला टोमणा!

भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या आमदाराला अजितदादांनी मारला टोमणा!

पुणे – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशीच चर्चा रंगू लागली आहे. यावरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांना भरसभेत टोमणा मारला आहे. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजितदादांनी केल आहे.

दरम्यान मागील विधानसभा निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे लढवली होती. त्यामुळ् या दोन्ही पक्षांना याचा फटका बसला होता. परंतु लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या मतदारसंघात इंदापूर विधानसभेची उमेदवारी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापैकी कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळ् हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यास भरणे भाजपमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी बारामतीत एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकत्र आले होते. यावेळी भाषण संपवताना अजित पवार यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराचं स्वतःच्या मतदारसंघात स्वागत केलं. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांचं तमाम बारामतीकरांच्या वतीनं स्वागत असं म्हणतानाच असंच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टिकावा हीच अपेक्षा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS