अजितदादांना आली आबांची आठवण, झाले भावूक !

अजितदादांना आली आबांची आठवण, झाले भावूक !

पुणे – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिवंगत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची आठवण आली असल्याचं पहावयास मिळालं आहे. आबांच्या आठवणीनं अजितदादा काही काळ भावूक झाले होते. हुक्का पार्लर आणि डान्सबारवर बंदी घालून तरूणांना व्यसनांच्या उंभरठ्यावरून परत फिरवत हजारो कुटुंबांचे संसार माजी गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी वाचवला. पण, त्यांना स्वत:लाच व्यसन सोडता आले नाही. दुर्दैवाने त्यांना झालेल्या कॅन्सरचीं लक्षणेही वेळेत कळली नाहीत. अन्यथा आबा वाचले असते, असे भावोद्गार अजितदादांनी काढले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान चालवले जात आहे. या अभियानाची सुरूवात वानवडी येथून करण्यात आली असून त्यावेळी अजित पवार बोलत होते.

दरम्यान पुणे-मुंबईसारख्या शहरातील तरुणपीढी व्यसनाकडे वळत आहे. या शहरांमध्ये हुक्का पार्लरची नवीन संस्कृती निर्माण होताना दिसत असून दुर्दैवाने केवळ मुलेच नव्हे तर, तरूण मुलीही मोठ्याप्रमाणात अशाप्रकारची व्यसने करत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या अती आणि सातत्यापूर्ण सेवनामुळे कॅन्सरसारख्या रोगाची लागन होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच सावध होत तरूणांनी व्यसनांपासून दूर रहण्याचा सल्लाही अजित पवार यांनी त्यावेळी दिला.

COMMENTS