मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत यावे असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. मनसेने समविचारी पक्ष म्हणून आघाडीसोबत यावे, तसेच मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेने गेल्यावेळी एक लाख मतं घेतली होती. माझं वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र मनसेसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा नसल्याचं म्हटलं होतं. तसेच काँग्रेसही मनसेला आघाडीत घेण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी काल पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे. अशातच आता पुन्हा अजित पवार यांनी मनसेनं महाआघाडीसोबत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे याबाबत आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS