नागपूर – संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेत आजत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. कोण तरी एक व्यक्ती उठते आणि संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षा मनुचे विचार श्रेष्ठ असल्याचं सांगते. ९७ टक्के समाजाला शुद्र समजणा-या मनुपुढे तुकाराम महाराज आणि माऊलींना कमी लेखलं जातं. त्यामुळे संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच मागील वेळी तर हे वारीत तलवारी घेऊन आले होते. यामागे कोण आहे हे राज्यातील जनतेला कळलं पाहिजे असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.
सरकारची बोटचेपी भूमिका –विखे पाटील
दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा मुद्दा उचलत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या बोटचेपी भूमिकेमुळे ही हिम्मत होत असून सरकार या शक्तींना पाठिशी का घालत आहे असा सवालही विखे पाटील यांनी केला आहे. ही प्रवृत्ती राज्याला हानीकारक असून शासन कारवाई करत नाही म्हणजे सरकार या विचारांशी सहमत आहे का तसेच पादुकांचे दर्शन घेण्याची बंदी घातली असताना ते तिथे पोहचले कसे असे सवालही विखे पाटील यांनी केले आहेत.
कुठलेही समर्थन करत नाही -मुख्यमंत्री
दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकर दिलं असून राज्य सरकारची विचारधारा ही घटनेप्रमाणे आणि तुकोबा, माऊलींच्या विचाराने बांधलेले आहे. मनुचे विचार कुठल्याही स्तरावर मान्य नाहीत, त्याचे कुठलेही समर्थन सरकार करत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याही काळत शिवप्रतिष्ठानचे लोक शस्त्रांचे प्रदर्शन करायचे ही जुनी परंपरा आहे. आम्ही मागील वर्षी शस्त्र घेऊन पालखीचे स्वागत केले जाते त्यावर बंदी घातली, दर्शनाला बंदी नाही. तसेच बोलले गेले असेल ते तपासले जाईल आणि संविधानाविरोधात असेल तर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे.
COMMENTS