मुंबई – डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं? या विवंचनेत बुलढाण्यात एका शेतकरी महिलेनं सरण रचून आत्महत्या केली. आत्महत्यांच्या यादीत शेतकरी महिलांचाही समावेश होणं, हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं ट्वीट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्य खरंच कर्जमुक्त झालं का? असा सवाल देखील अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं? या विवंचनेत बुलढाण्यात एका शेतकरी महिलेनं सरण रचून आत्महत्या केली. आत्महत्यांच्या यादीत शेतकरी महिलांचाही समावेश होणं, हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis महाराष्ट्र राज्य खरंच कर्जमुक्त झालं का?https://t.co/FqKF9vjlaL
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 16, 2018
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा भनगोजी येथे शेतकरी महिलेने नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतात स्वत: सरण रचून महिलेने आत्महत्या केली आहे. आशा इंगळे असे या महिलेचे नाव असून त्या माजी सरपंचदेखील होत्या अशी माहिती आहे. धोत्रा भनगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन आहे. मात्र, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या आर्थिक विवंचनेत होत्या.
आशा यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले असून एका मुलीचे लग्न झाले आहे. तर त्यांची दोन्ही मुले रोजंदारीवर काम करतात. आशा इंगळे यांच्यावर एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. दुष्काळामुळे यंदा आणखी परिस्थिती आणखी बिकट येणार, असे त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेवरुन अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS