सातारा, कराड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केलं जात आहे. यावर बोलत असताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं. कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये म्हणून सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शरद पवारांनी काल जयसिंगराव गायकवाडांच्या पक्ष प्रवेशात सरकार पडणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर मी जास्त बोलणं योग्य दिसत नाही. शरद पवार आमच्या सर्वांचं दैवत आहेत आणि त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते 105 लोकं असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं आहे. त्यामुळेच सारखं काही ना काही कांड्या पेटवायचं काम त्यांचं सुरू असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
तसेच ईडीचा वापर कसा करायचा हा केंद्राचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. राज्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाल्यास राज्याचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. आजपर्यंत आपल्या पोलिसांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. माझं प्रताप सरनाईकांशी बोलणं झालेलं नाही. कॅबिनेटमध्ये असताना आम्हाला ही बातमी समजली. त्यानंतर मी कराडला निघून आलो, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार कराडला गेले असता त्यावेळी ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
COMMENTS