नाशिक: राज्यसभेचा कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या या भाषणाची चर्चा काल देशभरातील माध्यमांमध्ये होती. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना टोला हाणला.
राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे जिल्हानिहाय आढावा घेत आहेत. आज ते नाशिकमध्ये होते. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संसदेत झालेल्या भाषणावर टिप्पणी केली. ‘नरेंद्र मोदी यांनी जो भावुकपणा काल संसदेत दाखवला, तोच भावुकपणा त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल,’ असं अजित पवार म्हणाले.
‘तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी आपल्या न्यायहक्कांसाठी आंदोलन करत आहेत. दोन्ही बाजूंनी दोन-दोन पावलं मागे येऊन यावर तोडगा काढायला हवा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याआधी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मोदींच्या या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती. ‘मोदी हे कधी शरद पवारांसह विरोधी नेत्यांचे कौतुक करतात तर कधी त्यांच्यावर जोरदार टीका करतात. खरे मोदी कोणते हे आता त्यांनाच विचारायला हवं,’ असं भुजबळ म्हणाले होते.
COMMENTS