नवी दिल्ली – देशभरातील विविध समाजाच्या आरक्षणासाठी ऑल इंडिया जॉईंट रिझर्वेशन कमिटीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे. मराठा, जाट, कापू आणि गुजर समाजाला आरक्षण मिळावे, या करिता ज्या राज्यात आंदोलन सुरू आहेत, त्या राज्यातील आरक्षणाचे नेते यांनी एकत्र येऊन ऑल इंडिया जॉईट रिझर्वेशन कमिटी स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे विनायकराव मेटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रामधील मराठा, गुजरातमधील पटेल, आंध्राप्रदेश व तेलंगणामधील कापू समाज, हारियाणामधील जाट तर राजस्थानमधील गुजर, जाट याच बरोबर अन्य राज्यातील आरक्षण चळवळीमधील नेते मंडळी दिल्ली येथे एकत्र आले होते. सर्व नेत्यांनी एकत्र यावे यासाठी आ. विनायक मेटे व जाट समाजाचे श्री. यशपाल मलिक यांनी प्रयत्न केले.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- आपण सर्वांनी एक होऊन लढा द्यावा.
- प्रमुख मागण्याबाबत एकमत करावे.
- इतर आरक्षणाला स्पर्श न करता आपली चळवळ पुढे घेवुन जावे.
- या करीता देश पातळीवर कमीटी स्थापन करावी.
- पुढील 10 मार्चला मुंबई येथे बैठक घ्यावी.
- दिल्ली व प्रत्येक राज्यात जनजागृतीसाठी मेळावे घ्यावेत.
इत्यादी निर्णय बैठकीत घेण्यात आले. सदरील बैठकीस महाराष्ट्रातून आ. विनायक मेटे, श्री. तानाजीराव शिंदे, हारियाणामधून श्री. यशपाल मलिक, श्री. सुरेश मधुरौली, गुजरातमधून श्री. मनोज पनारा व श्री. उदय पटेल (हर्दिक पटेलचे सहकारी), आंध्र प्रदेशचे श्री. गंगाराव, श्री. मानवेंनद्र वर्मा (उत्तर प्रदेश), डॉ. मनिष चौधरी (राज्यस्थान) श्री. सुमेर सिंह गेहलोत (दिल्ली), श्री. आझाद लखाल मेरठ इत्यादी 50 च्या वर प्रतिनिधी हजर होते. या चळवळीमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी ताकद मिळणार असल्याचं वक्तव्य आमदार विनायक मेटे यांनी केलं आहे.
COMMENTS