राजकीय, बिगरराजकीय संघटनांकडूनही शेतकरी मोर्चाला पाठिंबा !

राजकीय, बिगरराजकीय संघटनांकडूनही शेतकरी मोर्चाला पाठिंबा !

मुंबई – राज्यातील शेतक-यांनी काढलेल्या मोर्चाला राजकीय पक्षांसह इतर संघटना आणि संस्थांकडून पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हा मोर्चा जरी राज्यातला असला तरी त्याची सध्या देशभरात चर्चा सुरु असून शेत-यांना पाठिंबाही दर्शवला जात आहे. नाशिक ते मुंबई असा पायी प्रवास करून मुंबईत धडकलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या ‘लाँग मार्च’ला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी जगला तरच आपण जगू शकू अशा भावना व्यक्त करीत मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ‘लाँग मार्च’ला पाठिंबा देत असल्याची माहिती दिली.

दरम्यान या मोर्चाला इतर समाजातील नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला असून मुंबईत पोहोचलेल्या बळीराजाला मुस्लिम संघटनांची साथ दिली आहे. सोमय्या मैदानावरून भल्या पहाटे आझाद मैदानावर पोहोचलेल्या शेतकऱ्यांना मुस्लिम आणि शीख संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाणी आणि बिस्किटचे वाटप केले आहे.

तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लाँग मार्चला पाठिंबा दर्शवला आहे. हा केवळ शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाही, तर सरकारसाठी शेतकऱ्यांचा हा इशाराच आहे, असं पिनराई यांनी म्हटलं आहे.

तसेच दिल्लीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवत या मोर्चाला केवळ एका राज्याचं नाही तर देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन म्हटलं आहे.

 

COMMENTS