कोल्हापूर – पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला असून या पुजा-यांमध्ये आता ५० टक्के महिला पुजा-यांचा समावेश करण्यात येणार आहे. या मंदिरात राज्यस्तरीय परिक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्यात येणार आहेत.
दरम्यान ‘श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था, कोल्हापूर’ अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असून मंजूर विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येणार आहे. त्यामुळे पूजा करणा-या व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. परंतु असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येणार आहे. तसेच मंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात येणार असून या समितीत एकूण आठ सदस्य असणार असून कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.
COMMENTS