गोंदिया – आमगाव नगर परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे आमगाव नगर परिषदेची निवडणूक वेळेत होणार आहे. राज्य सरकारने तयार केलेली ही नवीन नगर परिषद उच्च न्यायालयानं रद्द केली होती. राज्य सरकारने काढलेले राजपत्र उच्च न्यायालयाने फेटाळून यात नियमावलीचे पालन केले नसल्याचा ठपका लावण्यात आला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे या नगरपरिषदेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या नगरपरिषदेत आमगावसह रिसामा, कुंभारटोली, बनगाव, बिरसी, पदमपूर, किडंगीपार, माल्ही या आठ गावांचा समावेश आहे. आमगाव व परिसरातील गावांना एकात जोडून नगरपरिषदेचा दर्जा देणे हा निर्णय नागरिकांसाठी अन्यायकारक ठरणारा असल्याचा आरोप करत या निर्णयाविरूध्द आमगाव व परिसरातील गावांच्या नागरिकांनी एल्गार पुकारून १५ हजारापेक्षा अधिक आक्षेप शासनाकडे नोंदविले होते. तसेच त्याठिकाणच्या स्थानिक विरोधकांनी देखील या नगरपरिषदेला विरोध दर्शवला होता.
सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायलयाच्या या निर्णयाला स्थगिती दिली असल्यामुळे आता नवीन नगरपरिषद मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता लवकरच आमगाव नगरपरिषदेसाठी निवडणूक घेण्यात येईल हे निश्चित झाले आहे.
COMMENTS