नवी दिल्ली – राज्यातील राज्यसभेच्या सात जागांची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या जागांसाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पर्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील संसद भवनात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावावर सहमती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील सात राज्यसभेच्या जागेवर चर्चा करण्यात आली. त्यात उदयनराजे भोसले यांच्या नावावर शाह आणि फडणवीस यांची सहमती असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे.
या नेत्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपणार
राष्ट्रवादीचे शरद पवार, अॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.
COMMENTS