मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पाठिंबा घेण्याबाबत अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते होते. पक्षाने त्यांना सरकार स्थापन करण्याचा अधिकार दिला होता. राज्यपालांनी देखील त्यांचा सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले होते आणि त्यांनीच सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले होते. अजित पवारांनी स्वत:हून आम्हाला पाठिंबा दिला होता आम्ही त्यांच्याकडे गेलो नव्हतो. फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याच्या पत्रावर अजित पवार यांची स्वाक्षरी आहे. इतकच नव्हे तर अजित पवार यांचा पाठिंबा घेतला म्हणून त्यांच्यावरील कोणताही खटला मागे घेतला नसल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अजित पवारांचा पाठिंबा घेत असताना आम्ही विचारसरणीशी कोणत्याही पद्धतीची तडजोड केली नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने सर्वात पहिल्यांदा जनादेश तोडला. निवडणुकीच्या आधीची युती तोडली आणि विचारसरणीच्या विरुद्ध गेले. आमच्यावर घोडेबाजाराचा आरोप केला जात आहे. पण भाजपचे सर्व आमदार मोकळे फिरत होते. शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी विचारसरणीशी तडजोड केली. निवडणुकीच्या प्रचारानंतर उद्धव ठाकरे 23 तारखेला अयोध्येत जाणार होते. पण मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांनी दौरा रद्द केला असल्याचा आरोपही शाह यांनी केला आहे. ते एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
COMMENTS