गोवा – गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर हेच राहणार असल्याचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गोव्यात नेतृत्व बदलाचा प्रश्न निकालात निघाला आहे. पक्ष अध्यक्ष, कोअर कमिटी आणि भाजपा आमदार, नेते यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सध्या आजारी असलेल्या नगर नियोजन मंत्री फ्रान्सिस डिसुझा आणि वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांना बदलून त्यांच्या जागी कुडचडेचे आमदार निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांना घेण्यात येणार आहे. नाईक यापूर्वी मंत्री होते त्यांचा शपथविधी आज किंवा उद्या सकाळी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार मिलिंद नाईक
दरम्यान गेली काही दिवसांपासून मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती बिघडत चालली आहे. त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले. त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पर्रीकरांच्या बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे गोवा प्रशासनातील अनेक कामं ठप्प झाली होती. त्यानंतर सत्ताबदलासाठी काँग्रेसनंही हालचाली सुरु केल्या होत्या.
आमदार निलेश काब्राल
दरम्यान याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यातील भाजपच्या शिष्टमंडळानंही भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर अमित शाह यांनी पर्रीकरच मुख्यमंत्री राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या तरी गोव्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS