नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींना खडेबोल सुनावले आहेत. लोकसभेत सत्यपाल सिंह बोलत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी अडथळा आणला. त्यावेळी अमित शाह आपल्या आसनावरुन उठून उभे राहिले व तुम्ही आधी का नाही बोललात? ओवेसी साहब सुनने की भी आदत डालिए अशा शब्दात ओवेसींना खडेबोल सुनावले. यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी मी कोणाला घाबरवत नाहीय पण कोणाच्या मनात भीती असेल तर मी काही करु शकत नाही असे अमित शाह ओवेसींना उद्देशून म्हणाले.
दरम्यान एनआयए सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना दोन्ही नेत्यामध्ये ही वादावादी झाली. भाजपाचे खासदार सत्यपाल सिंह बोलत असताना ओवेसींसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. राज्यातील एका नेत्याने हैदराबादच्या पोलीस प्रमुखांना एका ठराविक प्रकरणात तपासाची दिशा बदलण्यास सांगितले होते. जर असे केले नाही तर बदली करण्याची धमकी दिली होती असा आरोप सत्यपाल सिंह यांनी केला. त्यावरुन वादावादीला सुरुवात झाली.
त्यावेळी मी मुंबईचा पोलीस आयुक्त असल्यामुळे मला या घडामोडींची कल्पना होती असे सिंह म्हणाले. त्यांच्या या विधानावर ओवेसी यांनी आक्षेप घेतला व पुरावे सादर करण्याची मागणी केली. त्यावर अमित शाह आपल्या जागेवरुन उठून उभे राहिले व दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी विरोधी सदस्यांनी संयम बाळगला पाहिजे असे ओवेसींना सुनावले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
COMMENTS