मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केल्यानंतर युतीसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. याच युतीबाबत आता खुद्द भाजपाध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. अमित शाह मातोश्रीवर जाऊन संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी अमित शाह २०१९ निवडणूक एकत्र लढण्यासंबंधी उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीकड राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान संपर्क अभियान अंतर्गत अमित शाह हे मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानुसार ते शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर, सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजप युतीतील संघर्ष विकोपाला गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा युतीच्या वाटाघाटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.
दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीबाबत खूप गुप्तता पाळण्यात आली आहे.
COMMENTS