औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने केलं – अमोल कोल्हे

औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने केलं – अमोल कोल्हे

पुणे – राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने केलं असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापी हे होऊ देणार नाही असंही कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाणार असल्याची माहिती आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे. यावरुन खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर टीका केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जोरदार विरोध केला आहे. महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे असल्याचं ट्वीट सुळे यांनी केलं आहे.

COMMENTS