अमरावतीमध्ये नवनीत राणांची कोंडी, पिंपरी चिंचवडच्या नगरसेविकेला भाजपची लोकसभेची  उमेदवारी ?

अमरावतीमध्ये नवनीत राणांची कोंडी, पिंपरी चिंचवडच्या नगरसेविकेला भाजपची लोकसभेची  उमेदवारी ?

आमदार रवी राणा यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे झाले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये भाजपची उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र ती शक्यता मावळल्याची चर्चा आहे. स्थानिक भाजप नेत्यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नवनीत राणा यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढल्या होत्या. मात्र मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. युतीचे आनंदराव आडसुळ मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. 2014 ची निवडणूक झाल्यापासून आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार रवी राणा हे सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच नवनीत राणा यांनाच अमरावतीमधून भाजपची उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. आता मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे ती मावळली आहे.

पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नेत्या सिमा सावळे या मुळच्या बडनेराच्या आहेत. त्यांचं नाव अमरावतीमधून लोकसभेसाठी चर्चेत आहे. अमरावतीमध्ये जाऊन त्यांनी महिला मेळावाही घेतला आहे. नवनीत राणा यांच्याशिवाय स्थानिक भाजप नेत्यांना कोणीही चालू शकेल. सिमा सावळे या पिंपरी या राखीव मतदारसंघातून विधानसभेसाठीही इच्छुक आहेत. मात्र पिंपरीची जागा आरपीआय आठवले गटाकडे आहे. त्यामुळे सावळे यांना पिंपरीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच त्या अमरावतीमध्ये लोकसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे.

भाजपकडून पत्ता कट झाल्यास नवनीत राणा यांना दुसरा सक्षम पर्याय नाही. गेल्यावेळी नवनीत राणा यांना तिकीट दिल्यामुळे पक्षातून बाहेर पडलेले संजय खोडके पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले आहेत. त्यामुळे नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळणे दुरापास्त आहे. अदलाबदलीमध्ये अमरावतीची जागा काँग्रेसकडे गेली तर ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना तिथून तिकीट मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना शेवटी भारिप बहजुन आणि एमआयएम या युतीकडून निवडणुक रिंगणात उतरावे लागेल अशी शक्यता आहे.

COMMENTS