हैद्राबाद – आंध्र प्रदेशमधील जगन मोहन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वायएसआर काँग्रेसने राज्याची विधान परिषदच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.वाएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवडा अमरनाथ यांनी ही माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या वरिष्ठ सभागृहाच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
दरम्यान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना तीन राजधान्या अस्तित्वात आणायच्या आहेत. मात्र त्याबाबतचं विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडलं आहे. त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू यांना धक्का देत विधानपरिषद बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.राज्यात १७ डिसेंबरपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने विधान परिषद संपुष्टात आणण्याचा ठराव मंजूर केला.
सत्ताधारी वायएसआर काँग्रेस वेगळेच धोरण राबवित आहे. ज्यामध्ये विरोधी पक्ष तेलगू देसम पार्टीच्या (टीडीपी) विधान परिषदेच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वायएसआर काँग्रेसने यापूर्वीच टीडीपीमध्ये फूट पाडत दोन विधान परिषदेच्या आमदारांना पक्षापासून वेगळं केलं आहे.जर हीच परिस्थिती कायम राहिली तर वायएसआर काँग्रेस विधान परिषदेत २०२१ मध्येच बहुमत सिद्ध करु शकते. जेव्हा विरोधी पक्षाचे अनेक सदस्य सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर निवृत्त होतील.
COMMENTS