रायगड – केंद्र सरकारने ई-पासबाबत नव्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातही ई-पासची सक्ती कायम राहणार नसल्याची चर्चा होती. परंतु राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली आहे. सध्या महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहिल असं ते म्हणालेत.
दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या सूचनाबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला. सुरुवातीला 3 महिने ग्रामीण भागात कोरोना नव्हता. मात्र, निर्बंध कमी केल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील असं ते म्हणालेत. रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तसेच रोहा बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची देखील त्यांनी आज भेट घेतली. या प्रकरणी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
तसेच महाराष्ट्र पोलीस अतिशय सक्षम असून अनेक वर्षांपासून त्यांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्र पोलिसांना सर्वाधिक 58 राष्ट्रपती पुरस्कार मिळालेत. त्यात तपासाबाबत महाराष्ट्राला 10 पुरस्कार मिळालेत. मला कोणत्याही राज्याची तुलना करायची नाही. पण बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांना त्यांच्या कामासाठी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती घेतली तर महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहेत हे कळेल असंही
देशमुख यांनी म्हटलं आहे.
COMMENTS