सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

सरपंचपदाच्या बोलीस अण्णा हजारेंचा विरोध

अहमदनगर: सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करणे हा उत्तम पर्याय असल्याचे समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तसेच ‘ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करून निवडणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो.’

सध्या सुरू राज्यभरात सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी सरपंच पदांचे लिलाव झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावर अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला.हजारे म्हणाले, ७० वर्षांत काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय? पंचायत राज मजबूत व्हावे यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च आहे. ग्रामसभा ही गावची संसद असून ग्रामपंचायत (एक्झिक्युटिव्ह बॉडी) कार्यकारी मंडळ आहे. या दोन्ही घटकांनी एकमेकांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबूत करावयाची आहे. आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडून पाठविते. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असणारे चारित्र्यशील उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून पाठवायचे आहेत.

ग्रामपंचायत सरपंचपदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसभा ही सार्वभौम असून स्वयंभू आहे. १८ वर्षांचे वय झाले, मतदान करण्याचा अधिकार आला की प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य होतो. एकदा सदस्य झाला की मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे हा लोकशाहीचा लिलाव आहे. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे, असेही अण्णांनी सांगितले.

COMMENTS