भाजपच्या दिग्गज नेत्यांना अपयश, अण्णा हजारे आंदोलनावर ठाम !

भाजपच्या दिग्गज नेत्यांना अपयश, अण्णा हजारे आंदोलनावर ठाम !

मुंबई – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दोन ऑक्टोबरपासून आपण आंदोलन करणार असल्याचं पुन्हा एकदा अण्णांनी म्हटलं आहे. अण्णा हजारेंच्या या भूमिकेमुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांना अपयश आलं असल्याचं दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली होती. तसेच आंदोलन करु नका अशी विनवणी त्यांनी अण्णांकडे केली होती. याचबरोबर इतर नेत्यांनीही अण्णा हजारेंशी संपर्क साधला होता. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आल्याचं दिसत असून अण्णा हजारे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

दरम्यान लोकपाल आणि कृषी समस्या या विषयांवर दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लोकपाल बाबत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला आहे.

येत्या 2 ऑक्टोबरपासून अण्णा राळेगणमध्ये आंदोलन करणार असले, तरी दिल्ली व देशातील अन्य अनेक ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरु आहे. देशात सध्या भाजपच्या विरोधात वातावरण तयार होतं असून अण्णांच्या आंदोलनामुळे भाजप सरकारच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS