मुंबई – कोरोनाच्या काळात बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. देशातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.
आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. आसाममध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान २७ मार्चला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे १ एप्रिल आणि ६ एप्रिलला होणार आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला सगळ्या जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीत ६ एप्रिलला मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसरा टप्पा १ एप्रिलला, ६ एप्रिलला तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. १० एप्रिलला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. १७ एप्रिलला पाचव्या टप्प्याचं, २२ एप्रिलला सहाव्या टप्प्यातील, २६ एप्रिलला सातव्या टप्प्यातील आणि आठव्या टप्प्यातील मतदान हे २९ एप्रिलला होणार आहे. २ मे ला सर्व राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
COMMENTS