औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन चिघळत असल्याचं दिसत आहे. आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेली घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये आणखी दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तर कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे कोरड्या नदीपात्रात उडी घेऊन एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणा तरुणाचं नाव गुड्डू सोनावणे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर जगन्नाथ सोनावणे या ५५ वर्षाच्या व्यक्तीने आरक्षणासाठी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांनाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं असून धरणेही धरले आहेत. अनेक ठिकाणी रास्तारोको करून वाहतुकीची कोंडी करण्यात आली आहे. गावागावात हे आंदोलन सुरू आहे.
COMMENTS