नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचं आज निधन झालं आहे. जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या दोन आठवड्यांपासून एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज 12: 07 वाजता त्याचं निधन झालं असल्याची माहिती एम्स रुग्णालयानं दिली आहे.
जेटली यांनी वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जेटली यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यानं त्यांना ९ ऑगस्टला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. आजारी असल्यामुळे त्यांनी मागील लोकसभा निवडणूक देखील लढवली नव्हती तसेच ते निवडणूक प्रचारापासूनही दूर राहिले होते.
अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला होता. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली होती. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७ या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली होती. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होती. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.
COMMENTS