नांदेड – गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले असून नांदेड व परभणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भेट देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली तसेच गारपिटीमध्ये मरण पावलेल्या भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांची चुडावा येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली.
परभणी जिल्ह्यातील चुडावा येथे गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. २४ तास उलटून गेले एकही सरकारी अधिकारी आला नाही. नुकसानीचा पंचनामा नाही, मदत नाही. हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण आहे. @INCMaharashtra pic.twitter.com/2N6MID50qn
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 13, 2018
अवर्षण, बोंडअळीचा प्रादुर्भाव, पीकविमा भरून न घेणे व न मिळालेली कर्जमाफी यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतक-यांवर गारपिटीचे आणखी एक अस्मानी संकट कोसळले आहे. गारपीट होऊन तब्बल २४ तास उलटले तरीही नांदेड व परभणी जिल्ह्याच्या अनेक भागात शासनाचा एकही प्रतिनिधी पोहोचला नाही. यावर खा. अशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. मयत भागिरथी कांबळे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करताना आर्थिक मदतही केली.
खा. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या आजच्या पाहणी दौ-याची सुरुवात नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांच्यासमवेत लिंबगाव जि. नांदेड येथून केली. गारपीटग्रस्त लिंबगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाविरूध्द तीव्र रोष नोंदविला केवळ पंचनामे करणे व ऑनलाईन माहिती भरून घेणे यापलिकडे हे शासन काहीच करत नाही त्यामुळे या शासनाला घालविण्याचीच वेळ आली आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया येथील अनेक शेतक-यांनी व्यक्त केली.
COMMENTS