मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणूक लढवणार नसून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून मी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवल्या जाणार असून याबाबतचा अंतिम निर्णय राहुल गांधीच घेतील असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायला मी तयार आहे असं स्पष्टीकरणही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.
दरम्यान 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता असून त्यामुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांची दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राज्यात 2019 ची निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. (नांदेड आणि हिंगोली) ज्यासाठी अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली होती.
COMMENTS