परभणी – राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात काँग्रेसचं एकदिवसीय उपोषण सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही परभणी येथे उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात शिव्या देण्याचा आणि पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरु असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. तसेच मतपट्टी घट्ट करण्यासाठी एकमेकांचं डोकं फोडून मत मिळविण्याचं काम आरएसएस आणि भाजप करत असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. तसेच भाजपला जातीयवाद पसरवायचा असून काँग्रेसने जातीय सलोखा ठेवण्याचं काम केलं आहे. 4 वर्षात आठ कोटी तरुणांना रोजगार द्यायला पाहिजे होता पण लाखामध्ये फक्त नौकऱ्या मिळाल्या असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात 13 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून यांना संवेदनशीलता उरली नसून मराठवाड्याची उपेक्षा सुरू आहे. महामार्गात गेलेल्या जमिनीला भाव मिळत नाहीत. तसेच पीक विम्याची अवस्था वाईट झाली असून 34 हजार कोटींचं कर्ज माफ झाल्याची घोषणा झाली पण कर्जमाफी झाली नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राज्यभरात काँग्रेस नेत्यांचं उपोषण
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर येथे, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नाशिक येथे, बाळासाहेब थोरात नगर येथे, हर्षवर्धन पाटील पुणे, शरद रणपिसे कोल्हापूर, माणिकराव ठाकरे अकोला, विलास मुत्तेमवार नागपूर येथे, विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथे उपवास करित आहेत.
COMMENTS