मुंबई – काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात प्रजातंत्र बचाओ दिवस म्हणून पाळण्यात आला आहे. लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ आज काँग्रेसनं धरणे आंदोलन केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आज मुंबई महापालिका मुख्यालयासमोर या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजभवनातून राजकारण सुरु असून राज्यपाल केंद्र शासनाच्या दबावाखाली काम करित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हे लोकशाहीसाठी धोकादायक असून राज्यपालांची भूमिका तटस्थ असायला हवी, पण दुर्दैवाने ती तशी दिसत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच गोवा मणिपूरसाठी एक व कर्नाटकसाठी वेगळा निर्णय कसा असू शकतो असंही ते म्हणाले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह असून उद्या काँग्रेस, जेडीएसचा विजय होईल असंही ते म्हणाले आहेत. आमचा लोकशाहीवर विश्वास असल्याचंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते डी. राजा यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्तेही धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
COMMENTS