काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका !

मुंबई – भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा हा ‘संकल्पपत्र’ नसून तो आणखी एक ‘जुमलापत्र’ आहे, जनता त्यांच्या या जुमलेबाजीला आता थारा देणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले की, या जाहीरनाम्यात नवे काहीच नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, राम मंदिर बांधू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करु अशी आश्वासने त्यांनी २०१४ च्या जाहीरनाम्यात दिली होती. त्यातले एकही आश्वासन भाजप पाच वर्षात पूर्ण करु शकलेले नाही नविन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे कष्ट घेण्याऐवजी गेल्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा पुन्हा प्रकाशीत केला असता तरी चालले असते.

पाच वर्षात फक्त जुमलेबाजी करण्याशिवाय भाजप सरकारने काहीही केलेले नाही. या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, शेतकरी, छोटे व्यापारी देशोधडीला लागले. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली, शेतमालाला हमी भाव दिला नाही. आत्ता पुन्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करु, शेतकऱ्यांना पेन्शन देऊ, दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देऊ अशी आश्वासने दिलेली आहेत, मंदिर वही बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे, ही त्यांची भूमिका राहिली आहे. आता जनतेने या चौकीदाराची चोरी पकडलेली आहे. पुन्हा हा चौकीदार नको अशीच जनतेची भावना झालेली आहे. त्यामुळे जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेने आता भाजपला घरी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

COMMENTS