‘हा’ देखील घोटाळाच समजायचा का ? – अशोक चव्हाण

‘हा’ देखील घोटाळाच समजायचा का ? – अशोक चव्हाण

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस कार्यकाळात राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याची बोंब ठोकत दुष्प्रचार करणारे भाजपचे सरकार आर्थिक व्यवस्थापनाबाबत तोंडावर पडले असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच अनेक गमजा मारत श्वेतपत्रिका काढणा-या या सरकारचे दात श्वेतपत्रिकेत दर्शवलेल्या मुद्द्यांवरच घशात गेले असून गेल्या चार वर्षात ६४ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करूनही सिंचन क्षमता न वाढल्याने हा देखील घोटाळाच समजायचा का ? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान भाजपच्या कार्यकाळात महाराष्ट्र गाळात चालला आहे हे स्पष्ट दिसत आहे. २०१३-१४ पर्यंत राज्यावर जवळपास २ लक्ष ६९ हजार ३४५५ कोटी रूपयांचे कर्ज होते. राज्य स्थापनेपासून ५४ वर्षात एवढे कर्ज सरकारने घेतले होते. परंतु केवळ चार वर्षात या सरकारने दुप्पट कर्ज घेतले.

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात आर्थिक व्यवस्थापन ढासळले आहे असा दुष्प्रचार करून तसेच राज्यावर प्रचंड कर्ज आहे अशी बोंब ठोकत फडणवीस सरकार स्थापन झाल्याबरोबरच राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने जानेवारी २०१५ मध्ये श्वेतपत्रिका काढून काँग्रेसच्या कार्यकालातील आर्थिक परिस्थितीचा ऊहापोह केला गेला होता. या श्वेतपत्रीकेत जे मुद्दे चुकीचे म्हणून दर्शवले होते त्याच मुद्यावर विद्यमान सरकार उघडे पडले असल्याची टीका चव्हाणांनी केली आहे.

 

COMMENTS