मुंबई – जळगावमधील विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना मारहाण करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. अशाप्रकारच्या घटना घडत असतील तर आपल्याला इतिहास माफ करणार नाही त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या या ट्वीटनंतर बालहक्क आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या मुलांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता, माध्यमांनीही तो दाखवला होता परंतु मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना अशी नोटीस बजावण्यात आली असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यातील कायदेशीर बाबी तपासून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.तसेच भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत, त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे असून यावर कुठली कारवाई केली जात नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा गोष्टींविरोधात आवाज उठवायचा नाही का?, अशा गोष्टींविरोधात आवाज उठवला, त्यात कारवाईची मागणी केली तर त्यात गैर काय आहे? असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला आहे.
COMMENTS