मुंबई – काँग्रेसनं आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला देशभरातील अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेनं मात्र या बंदला पाठिंबा दर्शवला नाही. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेला जराही लाज असती तर ते आज आंदोलनात उतरले असते असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सरकारची दडपशाही आहे, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असून जनतेने देशव्यापी बंदला चांगला प्रतिसाद दिला असल्याचंही चव्हाणांनी म्हटलं आहे. तसेच जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हा बंद पाळण्यात येत असून बंद १०० टक्के यशस्वी झाला असा दावा मी करणार नाही, पण लोक आणि व्यापा-यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवसेनने महागाईचे फलक मुंबईत लावले मात्र नुसते फलक लावून चालत नाही. तुम्ही रस्त्यावर उतरायला हवं. शिवसेनेचे सत्तेत राहणंही नैतिकतेला धरून नाही.
शिवसेनेला जराही लाज असती तर ते आज आंदोलनात उतरले असते. भाजपाच्या दबावाखाली ते काम करतात. राजस्थान सरकारने व्हॅट कमी केला इथे आमचे सरकार असते तर हा विषय दहा मिनिटात संपला असता. तसेच भाजपा शिवसेनेच्या सरकारला संवेदना नाहीत, जनतेच्या संवेदना त्यांना समजत नसल्याची जोरदार टीकाही चव्हाणांनी केली आहे.
COMMENTS