मुंबई – खासदारांना घेऊन देवदर्शन करत फिरण्याऐवजी शिवसेना पक्षप्रमुखांनी नालेसफाई करून घेतली असती तर आज मुंबईवर पावसामुळे बुडून जाण्याची वेळ ओढवली नसती, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पावसामुळे मुंबईच्या झालेल्या दूरवस्थेवर बोलताना त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई महापालिकेत सलग दोन दशके सत्ता असतानाही जनतेला मुलभूत सोयी-सुविधा देण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. विकास तर दूरच पण नियोजनशून्य कारभार आणि अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे मुंबई अधोगतीच्या गाळात बुडते आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची लूटमार सुरू असताना स्वयंघोषित ‘पहारेकरी’ही झोपेचे सोंग घेऊन निवांत बसला आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला वेसन घालण्याचे धाडस भाजपात नाही. त्यामुळे मुंबईकर आता ‘रामभरोसे’ झाल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
मुंबईच्या महापौरांच्या असंवेदनशीलतेवरही त्यांनी कठोर प्रहार केला. ते म्हणाले की, म्हातारी मेल्याचे दुःख नाही. पण काळ सोकावू लागला आहे. मागील दोन दिवस संपूर्ण मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. तरी मुंबई सुरळीत असल्याचा दावा महापौर करतात. मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न केला जातो. त्यांची दृष्टी कदाचित अधू झाली असावी. महापौरांची ही विधाने संवेदना मेल्याचे निदर्शक आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी समुद्राच्या भरती-ओहोटीवर खापर फोडून तर कधी जास्त पाऊस झाल्याचा बहाणा सांगून शिवसेना दरवेळी नामनिराळी होण्याचा प्रयत्न करते, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपला संताप व्यक्त केला.
संपूर्ण मुंबई शहरासह खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या कलानगरात प्रचंड पाणी तुंबते. तळमजल्यावर राहणारे लोक आपले किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवतात. किमान ते बघून तरी ‘आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ याची जाहीर कबुली देऊन शिवसेनेने जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही काँग्रेस प्रदेशाध्यांनी केली.
मालाड, कल्याण, पुणे आदी ठिकाणी भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या २६ हून अधिक नागरिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतानाच या बळींसाठी पावसाइतकाच भ्रष्टाचारही कारणीभूत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. सरकार या भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या सर्व दोषींना कदाचित नेहमीप्रमाणे ‘क्लीन चीट’ देईल. आर्थिक मदत देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का? घरातील कमावते व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना खरा आधार मिळणार आहे का? पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची हमी मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.
COMMENTS