भाजप-शिवसेना सरकारनं शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप केलं – अशोक चव्हाण

भाजप-शिवसेना सरकारनं शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप केलं – अशोक चव्हाण

मुंबई – महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय शिक्षण राज्यातील विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीने महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची सुरुवात केली. या मंडळाने यंदा पहिली ते चौथीच्या पुस्तकाची छपाई केली आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे.

दरम्यान सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. चौथीच्या अभ्यासक्रमात असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात 1991 मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा मोठा वाद झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा चौथीच्या पुस्तकातील इतिहास न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर 2010 मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचनाही झाली मात्र चौथीचं इतिहासाचं पुस्तक तसंच ठेवण्यात आलं. 1970 मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर काही ठराविक बदल वगळले तर पुस्तक तसेच ठेवण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच वगळला आहे.

यावरुन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजप-शिवसेना सरकारनं शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचं पाप केलं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. गेल्या ५०ते६० वर्षांपासून ४थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला असल्याचं ट्वीट चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरवाचेही उल्लंघन या सरकारने केले. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट आहे. राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला २१ तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही असंही चव्हाण म्हणाले आहेत.

COMMENTS