मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन ठप्प झालंय. मात्र मुंबई कुठे तुंबली, असा प्रतिप्रश्न महापौर करतात. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.तसेच दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मालाड, कल्याण, पुण्यात भिंत कोसळून २५ बळी गेलेत. मुंबईत रस्ते वाहून गेलेत. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार कारणीभूत नाही का?
कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना ‘क्लीन चीट’ देईल. पण त्याने गेलेले जीव परत येणार आहेत का?पुन्हा अशा घटना घडणार नाहीत,याची हमी मिळणार आहे का?
असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान उर्वरित मुंबई तर सोडाच पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाच्या आजुबाजुला कलानगरात प्रचंड पाणी साचलंय. तळमजल्यावर राहणारे लोक आपलं किंमती सामान सुरक्षित ठिकाणी हलवताहेत. किमान ते बघून तरी’आम्ही मुंबई बुडवून दाखवली’ हे मान्य करून शिवसेनेनं जनतेची माफी मागितली पाहिजे असंही चव्हाणांनी म्हटलं आहे.
मुंबईत ठिकठिकाणी स्थानिक व बाहेरगावचे प्रवासी अडकून पडले आहेत. मदत तर सोडाच पण रेल्वे केव्हा सुरळीत होईल, याची साधी माहितीसुद्धा त्यांना मिळत नाहीये. लोक प्रचंड हालापेष्टा सहन करताहेत. सरकारने युद्धस्तरावर उपाय करून हे लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचतील, यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ट्वीट करन चव्हाण यांनी केली आहे.
COMMENTS