मुंबई – नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार आणि ती निवड कधी होणार याची उत्सुकता जळपास संपुष्टात आली आहे. काँग्रेसच्याच वाटेलाच हे पद जाणार आहे. काँग्रेसचे पुणे जिल्हयातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव या पदासाठी निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसच्या वरीष्ठ सूत्रांनी दिली आहे.
संग्राम थोपटे यांच्याशिवाय काँग्रेसकडून परभणी जिल्ह्यातील पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर आणि मुबंईतील मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमिन पटेल यांचीही नावे चर्चेत होती. मात्र अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या अधिवेशनात अध्यक्षाची निवड होऊ नये अशी भूमिका घेतली होती. मात्र काँग्रेसने यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामुळे आजच या पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्याती भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. 2009 पासून सातत्याने ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत. पवार घरण्याचे ते पारंपरिक विरोधक म्हणूनही त्यांची ओळख आहे. यावेळी मंत्रीमंडळ विस्तारात थोपटे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनात राडा केला होता.
संग्राम थोपटे यांचीच निवड का ?
यापूर्वी नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. आक्रमक नेते आणि काहीसे राष्ट्रवादी काँग्रेसची फारसं सख्य नसलेले नेते अशी त्यांची ओळख होती. अगदी तसाच नेता काँग्रेसला अध्यक्षपदासाठी हवा होता. त्यामध्ये थोपटे एकदम फिट बसतात. त्यामुळे थोपटेंना संधी मिळाल्याचं बोललं जातंय. ठाकरे सरकारमध्ये थोपटेंना राज्यमंत्री म्हणून संधी मिळणं अपेक्षित होतं. मात्र तीन पक्षांचं सरकार आणि त्यामुळे काँग्रेसच्या वाट्यच्या जागांची मर्यादित संख्या यामुळे त्यांना संधी देणं शक्य झालं नव्हतं. त्याचा विचार करुन काँग्रेसनं त्यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
COMMENTS