राज्यातील आणखी एक पक्ष लढवणार विधानसभेच्या सर्व जागा !

राज्यातील आणखी एक पक्ष लढवणार विधानसभेच्या सर्व जागा !

पुणे – आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे. कारण शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहूजन आघाडी यांच्यासह राज्यातील आणखी एका पक्षानं विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. तो पक्ष म्हणजे संभाजी ब्रिगेड होय. पुण्यासह राज्यातील सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढवणार असून कामाला लागण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड’साठी प्रतिष्ठेची आहे. कारण संभाजी ब्रिगेड लोकांसाठी सतत संघर्ष करत आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बुथ कार्यकर्त्यांची सक्षम बांधणी करून प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक जिंकण्याचा संकल्प करावा लागेल. ‘वन बुथ थर्टी युथ…’ हा संभाजी ब्रिगेडचा फॉर्म्युला विधानसभा अध्यक्ष व उमेदवाराला बंधनकारक असल्याचं पक्षाचे नेते मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

तसेच विधानसभेची निवडणूक संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार असून विधानसभेवर संभाजी ब्रिगेडचा भगवा झेंडा फडकला शिवाय संभाजी ब्रिगेडचा कुठलाही कार्यकर्ता शांत बसणार नाही. संभाजी ब्रिगेड जिंकण्यासाठी निवडणूक लढणार आहे. तसेच समविचारी पक्ष संघटना व कार्यकर्ते सोबत घेऊन (फ्रंट तयार करून) ब्रिगेड विधानसभेचे लढाई जिंकणार आहे. आमची लढाई प्रस्थापितांना सोबत व जातीयवाद्यांशी असल्याने समाजकारण व राजकारणातील ‘पोकळी’ संभाजी ब्रिगेड भरून काढू शकते, हा ठाम विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला असला पाहिजे…*असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभेसह सर्व जागा संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या जीवावर स्वबळावर लढणार आहे. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपासून पूर्णवेळ कामाला लागावे.अशा सूचना पुण्यातील ‘पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकी’ च्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटन बांधणी कडे लक्ष देऊन पुढील काळात घराघरात संभाजी ब्रिगेड पोहोचली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांची तगडी फळी निर्माण केली पाहिजे. कुणाचीही गय केली जाणार नाही अशा सूचना देण्यात आल्या.

सदर बैठकीला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, प्रकाश धिंडले, पंढरीनाथ सोंडकर, चंद्रशेखर घाडगे, सनी थोपटे, शिवाजी पवार, महादेव मातेरे, विवेक तुपे, अजय पवार, जोतिबा नरवाडे, रमाकांत सुतार, प्रितम घाटे, रमेश परळीकर, नितीन शिंदे, संतोष मुळे, पांढुरंग पाटील, प्रकाश पारखे, प्रशांत चव्हाण, दत्ता इंगळे, महेश अंबड, मारूती चव्हाण, तस्मिन चाऊस, उमेश देवगिरिकर, सचिन अवघडे, बापू पवार, विकि मस्के, नयन ओहाळ, रंजीत दामगुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS