मुंबई – सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून ओळख असलेली धावपटू कविता राऊतही आता विधानसभेच्या राजकीय मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे. कविता राऊत इगतपुरी विधानसभा या आदिवासी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवेल अशी चर्चा आहे. याबाबत आघाडीकडून जोरदार प्रयत्न सरु असून उमेदवारीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास जरूर सकारात्मक विचार करू,’ अशी प्रतिक्रिया कविता राऊत हिच्या पतीने दिली आहे. त्यामुळे आगामी काळात धावपटू कविता राऊत राजकारणाच्या ट्रॅकवर धावणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान या मतदारसंघातून निर्मला गावित यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
काँग्रेसकडून अद्याप उमेदवार निश्चित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देऊन याठिकाणी कविता राऊत यांना मैदानात उतरवलं जाणार असल्याचं दिसत आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही. झालीच तर ही जागा शिवसेनेला सुटणार आहे. तसेच आघाडीमध्ये या वेळी इगतपुरीची जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्मला गावित यांना शह देण्यासाठी आघाडीकडून धावपटू कविता राऊत यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
COMMENTS