आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय!

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संभाजी ब्रिगेडचा मोठा निर्णय!

पुणे – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संभाजी ब्रिगेडनं मोठा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडनं विधानसभेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची घोषणा आज पुण्यात पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली आहे.
पंचवीस वर्ष दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी जिंकण्याकरीता निवडणुका लढणार आहोत. विधानसभा उमेदवारांची पहिली यादी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. समविचारी पक्षाबरोबर ‘संभाजी ब्रिगेड’चे वरिष्ठ नेते चर्चा करत आहे. सन्मानाने सोबत घेतले तर ठिक अन्यथा स्वतंत्र, परंतु सत्तापरीवर्तन अटळ आहे. आम्हाला सगळे पर्याय खुले असल्याचं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी पुण्यातील बैठकीत हे व्यक्तव्य केले आहे. तसेच संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन अधिकृत चिन्ह मिळाले असून या चिन्हावर आगामी निवडणूक लढवली जाणार आहे.

या बैठकीत जिल्ह्याची कार्यकर्ता आढावा बैठक व विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती पहिल्या टप्प्यातील मुलाखती चर्चा घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर हे होते. यावेळी विचारपिठावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे व शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ उपस्थित होते.

यावेळी संतोष शिंदे म्हणाले गुरुवारपासून प्रत्येक विधानसभेमध्ये हे पदाधिकारी मेळावे सुरू होणार आहेत. संभाजी ब्रिगेड च्या रुपाने ‘विचारांचं वादळ’ पत्येक विधानसभेत राजकीय गोंधळ घालणार असून जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विधानसभेची संधी मिळणार आहे. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला होऊ देणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांच्या बांधणीवर भर देण्यात येत आहे. सरकार पूरग्रस्तांना पुरेशी मदत देऊ शकलेली नाही. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची फसवणूक केलेले असून भाजपला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असे मत संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

‘संभाजी ब्रिगेड’चा कोणालाही पाठिंबा नाही. आम्हाला कोणीही ही परके किंवा कोणीही जवळचे नाहीत. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ‘संभाजी ब्रिगेडचा विधानसभेचा निवडणूक पॅटर्न वेगळा असून तो लवकरच सर्वांना दिसणार आहे.’

दरम्यान राज्य सरकार पूरग्रस्तांना पुरेशी मदत देऊ शकलेले नाही. हजारो संसार उध्वस्त झाले रस्त्यावर आले. निवडणुकीमध्ये आमचा जन्म दुसऱ्यांना मोठे करण्यासाठी झालेला नाही. यावेळी मात्र आम्ही गाफील राहणार नाही. या विधानसभेला संभाजी ब्रिगेडचे पुण्यातून पहिले खाते उघडण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी करावा व पुण्यातूनच विधानसभेवर पहिला समतेचा ‘भगवा’ झेंडा ‘संभाजी ब्रिगेड’ फडकवणार असल्याचंही सौरभ खेडेकर यांनी म्हटलं आहे.

सदर बैठकीला…
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, महादेव मातेरे, चंद्रशेखर घाडगे, सनी थोपटे, ज्योतिबा नरवाडे, सिद्धार्थ कोंधळकर, पंढरीनाथ सोंडकर, नितीन शिंदे, संतोष मुळे, संदीप लहाने, सुरेखा जजगर, मोहिणी रणदिवे, प्रकाश पारखी, गणेश चराटे, महेश अंबड, दत्ता इंगळे आदी कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित दिली. यावेळी ‘संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष सनी थोपटे यांनी पूरग्रस्त भागातील पन्नास कुटुंबांना पुरेल एवढं अन्नधान्याची मदत पाठवली आहे.

COMMENTS