मुंबई – सर्वांचं लक्ष लागलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोलीसारख्या संवेदनशील मतदान केंद्रांवर दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. राज्यात शांततेत मतदान पार पडावे म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750
तर महिला मतदार 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 आहेत. तसेच तृतीयपंथी मतदार 2 हजार 634 असून दिव्यांग मतदार 3 लाख 96 हजार आहेत. या सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे.
हरियाणातील विधानसभेसाठीही आज मतदान
दरम्यान हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठीही आज मतदान पार पडत आहे. ९० जागांवर ही निवडणूक होणार असून,
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार हरियाणामध्ये एकूण १ कोटी ८३ लाख अधिकृत मतदार आहे. त्यामध्ये ४० वर्षांखालील मतदारांची संख्या ८९ लाख ४२ हजार ६६८, म्हणजेच सुमारे ५० टक्के इतकी आहे. राज्यात प्रथमच मतदान करणारे ३.८२ लाख मतदार असून, ४०.६७ लाख मतदार हे २० ते २९ वर्षे वयोगटांतील आहेत. ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या ४ लाख १८ हजार ९६१ इतकी आहे. फरिदाबाद आणि गुडगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदार असून, फरिदाबादमध्ये १५ लाख, तर गुडगावमध्ये १२ लाख मतदार आहेत.
याठिकाणी पोटनिवडणुकीसाठी मतदान
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या ११ जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पंजाबमध्ये फगवारा, दाखा, जलालाबाद आणि मुकेरियन या चार विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. या चार जागांसाठी एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत. हिमाचल प्रदेशातील पच्छड आणि धरमशाला या दोन विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक होत असून, या दोन्ही जागांवरील भाजपचे आमदार सुरेश कश्यप आणि किशन कपूर हे दोघेही लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. दरम्यान, राजस्थानमधील मांडवा आणि खिवसार या विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार असून, मांडवामध्ये नऊ, तर खिवसारमध्ये तीन उमेदवार रिंगणात आहेत.
तसेच महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. याठिकाणी भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील हे मैदानात आहेत.
COMMENTS