नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांसाठी देशभरातील पक्ष तयारीला लागले आहेत. मे महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु या निवडणुकांसोबतच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लोकसभेसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन-तीन महिन्यात या निवडणुका अपेक्षित असतात. मात्र, आता या तिन्ही राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्या जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच या तीन राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत व्हाव्यात, असा मानस स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाकडे बोलून दाखवला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे याबाबतची घोषणा लवकरच होऊ शकते असंही बोललं जात आहे.
COMMENTS