विधानसभेच्या विरोधी पक्षनेतापदासाठी ‘यांच्या’ नावाची चर्चा !

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतापदासाठी ‘यांच्या’ नावाची चर्चा !

मुंबई – काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. जून महिन्यात विद्यमान सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेता निवडला जाणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांपैकी एकाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ गळ्यात पडणार आहे.

दरम्यान काँग्रेसचे विधानसभेत 42 आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या वाटेवर असून नीतेश राणेही काँग्रेसमध्येच राहतील की नाही याबाबत शंका आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे विद्यमान आमदार के. सी. पाडवे, भाऊसाहेब कांबळे, कुणाल पाटील हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. ते खासदार झाल्यास त्यांनाही आमदारकी सोडावी लागणार आहे. स्वतः विखे-पाटीलही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 35वर येणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्याही 40 झाली आहे.

संग्राम जगताप तसेच राणा जगजितसिंह हेही लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांनाही खासदार झाल्यास आमदारकी सोडावी लागणार आहे. पक्षीय बलाबल अधिक असल्याने काँग्रेसकडे गेलेले विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचे आमदार कमी झाले तरी आपल्याकडे घेण्यास सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक नाही. यामागे आगामी निवडणुका एकत्र लढायच्या झाल्याच तर आघाडीत बिघाडी नको असे धोरण आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत तरी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS