महाविकासआघाडी सरकार बहुमत चाचणीत पास, विधानसभेत केलं बहुमत सिद्ध !

महाविकासआघाडी सरकार बहुमत चाचणीत पास, विधानसभेत केलं बहुमत सिद्ध !

मुंबई – गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाला अखेर काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं आहे.महाराष्ट्र विकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे. प्रस्तावाच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं. तर विरोधात 0 आमदारांनी मतदान केलं. यावेळी तटस्थ 4 आमदार राहिले. मनसे 1 आणि एमआयएम 2, माकप 1 या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे.

अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. रात्री अपरात्री बोलावून असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत म्हणून रात्री निरोप दिला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर सभागृहात भाजप आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजपा आमदारांकडून देण्यात आल्या.

COMMENTS